Monday, July 18, 2011

शि़क्षणाच्या आयचा घो......

काल मुलाच्या शाळेत पालक शिक्षक संघाची बैठक होती.पहिलीच बैठक असल्याने उपस्थिती चांगली होती.सुरवातीचे विषय(शिक्षक विद्यार्थ्यांच्या तक्रारी) झाल्यानंतर चर्चा सरकारने जाहीर केलेल्या नविन शिक्षण पध्दतीवर घसरली.
          १ली व २ रीच्या मुलांच्या लेखी परीक्षा होणार नाहीत असे मुख्याध्यापकांनी सांगीतल्यावर सभेत एकच गोंधळ उडाला.अनेक पालकांना आपल्या मुलाचे भवितव्य अंधारात गेल्याचा साक्षात्कार झाला.परिक्षेतील गुण हेच मुलाच्या विकासाचे मुल्यमापन करण्याचे ऐकमेव परिमाण असल्याने आता आमच्या पाल्याची प्रगती कशीहोणार असा काहिसा सुर बैठकीत होता.केंद्रसरकारने तसा कायदाच केल्याने आम्हाला त्याचे पालन करणे भाग असल्याचे शिक्षकांचे म्हणणे होते.त्यांना आलेल्या सरकारी परिपत्रकात याहुन अधीक खुलासा नसल्याने ते बिचारे बचावात्मक पवित्र्यात होते.काही पालक अजुन् आपल्या पाल्याला शाळेतील बाई घरचा अभ्यासात पाढे व शुध्दलेखन का देत नाहीत या चिंतेत दिसले.
 एकंदरीत पहाता आपल्याकडे शिक्षणाचा प्रसार व्यापक स्तरावर होवुन सुद्धा बाल शिक्षणाविषयी सुशिक्षित पालकांमधेही  जुनाट विचार आढळतो.घोकंपट्टी आणि छडी लागे  छमछम वरील आपला विश्वास अजुनही दांडगा आहे.शारिरीक शिक्षेला पर्याय गुरुजींना अजूनही सापडलेला नाही.हसत खेळत शिक्षण अजूनही स्वप्नवतच आहे.मुलांच्या पाठीवरली आणि डोक्यातली ओझी कमी होत नाहीत.(या देशात बालमजुरी हा दखलपात्र गुन्हा आहे.)
          या पार्श्वभुमीवर आपले शासन नविन शिक्षण संकल्पना रुजवण्यासाठी काय करतय? तर एक सरकारी परिपत्रक काढुन संपुर्ण देशात शैक्षणिक बदलाची अपेक्षा धरतय.ना शिक्षकांचे प्रशिक्षण,ना पालकांचे प्रबोधन.जो तो आपल्या वकुबाप्रमाणे या धोरणाचा अर्थ लावत आहे.
नवी मुल्यांकन पध्दत
मुल्यांकनाचे हे पहिले वर्ष आहे.या आधी वर्षाला चार परिक्षा व्हायच्या.त्यातुन मुलांची शैक्षणिक प्रगती समजायची.नव्या पध्दतीत  लेखी परिक्षांना रजा देण्यात आली आहे.त्या ऐवजी संबधीत विषयात आणि एकुणच विद्यार्थ्याची शैक्षणिक क्षमता कशी आणि किती आहे? याचे मुल्यांकन होणार आहे.त्या आधारे विद्यार्थ्याला श्रेणी देण्यात येईल.ही पध्दत बरीचशी कटकटीची व मुख्यत्वे शिक्षकांचे काम आणि त्रास वाढवणारी आहे.या साठी सरकार त्याना आपल्या वेठबिगारीतुन वेळ देणार आहे का?पालकही ह्या प्रक्रियेतील
महत्वाचा घटक आहे. 
जुन्या पध्दतीमधे विद्यार्थी परिक्षार्थी झाला होता.नव्या पध्दतीत त्याच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा आहे.पण काही धोक्यांचा ही विचार व्हावासा वाटतो.
  1. शिक्षकांवर असणारया जनगणना,निवडणुका,पोलिओ डोस आदी. बिगर शैक्षणिक जबाबदारया या मधुन प्रत्येक विद्यार्थ्याचे योग्य मुल्यमापनासाठी वेळ मीळणार का?
  2. परिक्षांचा सराव नसल्याने ९वीआणि १० वी अधीक कठीण वाटु लागेल.
  3. विद्यार्थ्याना स्पर्धात्मक ताणाची सवय् रहाणार नाही.
  4. अशिक्षित पालकाना श्रेणी पध्दती न कळल्यामुळे गोंधळ ऊडेल.
  5. नापास होणार नाही म्हणुन विद्यार्थी निवांत रहातील.
शेवटी योजना किंवा धोरणे कागदावर् कितीही आश्वासक वाटली तरी त्यांची यशस्विता ही लोकसहभागावर आणि त्या कार्यवाहीत् आणणारया कर्मचारयांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते.आणि या दोन् गोष्टी प्रबोधन व प्रशिक्षणाशिवाय साध्य होत नाहित.हे आपल्या शासनाला कळेल तो सुदिन.............




    No comments:

    Post a Comment